महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षक हजर राहणार नसल्याने अध्यापन पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या म्हणजे २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य करणे तात्काळ बंद करणे, तसेच १५ मार्च २०२४ चा संचमान्यता निर्णय रद्द करणे आणि जुने निकष लागू करणे. याशिवाय शिक्षणसेवक योजनेतील बदल मागे घेऊन सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी संघटनेने केली आहे. कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णयही संघटना मागे घेण्याची मागणी करत आहे.
संपाच्या दिवशी म्हणजेच ५ डिसेंबरला शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला शिक्षकांचा ठाम विरोध असून, हे धोरण अन्यायकारक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
या बंदचा परिणाम पालक व विद्यार्थ्यांवर होणार असून, ५ डिसेंबरसाठी पालकांनी मुलांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments are closed.