नागपूर जिल्ह्यात तापमान झपाट्याने वाढत असून ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळी ७ ते ११.३० या वेळेत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवीन शालेय वेळापत्रक:
- सर्व शाळा: सकाळी ७:०० ते ११:३०
- शिक्षक उपस्थिती: दुपारी १२:३० पर्यंत
- पालक भेटी व शालेय कामकाज: दुपारी १२:३० पर्यंत
राज्य शिक्षण विभागाने उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, नागपूर जिल्हा शिक्षण विभागाने हा निर्णय लागू केला आहे.
परीक्षा वेळेतच पूर्ण करण्याची मागणी
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेने वार्षिक परीक्षा २५ एप्रिल ऐवजी १० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय संयोजक योगेश पाथरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, नागपूरच्या उच्च तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून शिक्षण विभागाने परीक्षा वेळापत्रक लवकर करण्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.
- वाढत्या तापमानाचा विचार करून पुढील निर्णय अपेक्षित
- नागपूर शहरात आणि परिसरात उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत आहे.
- यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून शालेय वेळेत बदल करण्यात आला आहे.
- पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- परिस्थितीचा आढावा घेत शासन अधिक निर्णय घेऊ शकते.
पालक व विद्यार्थी यांनीही गरम हवामानात आवश्यक ती काळजी घ्यावी आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी योग्य ते पाणी व आहार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.