महाराष्ट्र शासनाने २०२५-२६ शैक्षणिक सत्रापासून चौथ्या व सातव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे पुनर्रचना केले आहे. याअनुसार, इयत्ता चौथीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये तर इयत्ता सातवीसाठी प्रतिवर्षी सात हजार पाचशे रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षांचा स्तर पूर्वीच्या इयत्ता पाचवी आणि आठवी ऐवजी चौथी व सातवीत करण्यात आला आहे. यामुळे २०२५-२६ शैक्षणिक वर्षात चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी आणि एप्रिल/मे २०२६ दरम्यान आयोजित होईल. २०२६-२७ पासून ही परीक्षा नियमितपणे या इयत्तांसाठी घेतली जाणार आहे.
विद्यार्थ्यांची पात्रता ही महाराष्ट्रातील शासकीय, अनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये चौथी किंवा सातवीत शिकणारी असावी. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व सामान्य विद्यार्थ्यांचे कमाल वय १० वर्षे व दिव्यांग विद्यार्थ्यांचे १४ वर्षे असून, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांचे वय १३ वर्षे व दिव्यांगांसाठी १७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
परीक्षेसाठी सामान्य विद्यार्थ्यांचे प्रवेश व परीक्षा शुल्क एकूण २०० रुपये आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या-जाती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकूण शुल्क १२५ रुपये आहे. प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी २०० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल.
शिष्यवृत्तीची रक्कम इयत्ता चौथीसाठी प्रतिवर्षी ५,००० रुपये आणि सातवीसाठी प्रतिवर्षी ७,५०० रुपये आहे. दोन्ही शिष्यवृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा असेल. या सुधारित प्रणालीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य होईल आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढेल.

Comments are closed.