राज्यात 5 डिसेंबरला शिक्षकांनी केलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचा शिक्षण विभागाने गंभीर पद्धतीने विचार घेत मोठा निर्णय केला आहे. या दिवशी मोठ्या संख्येने शिक्षक गैरहजर राहिल्याचे अहवालात समोर आले असून, प्राथमिक आणि माध्यमिक मिळून तब्बल 96,800 शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई विभागाने सुरू केली आहे.

गैरहजर शिक्षकांची यादी शिक्षण निरीक्षकांकडून मागवण्यात आली असून पुढील शिस्तभंगात्मक प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्राथमिक शाळांमध्ये 21,477 शाळांतील मोठ्या प्रमाणात अनुपस्थिती दिसली, तर माध्यमिक पातळीवर 2,539 शाळांतील शिक्षकांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला.
नाशिक (2,925) आणि पुणे (2,348) हे जिल्हे प्राथमिक पातळीवर सर्वाधिक प्रभावित ठरले. आंदोलनाचा केंद्रबिंदू दोन प्रमुख मागण्यांभोवती होता – 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करणे आणि शिक्षकांसाठी TET अनिवार्य न ठेवणे. आंदोलनानंतर जिल्हावार सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.
माध्यमिक स्तरावर मात्र परिस्थिती तुलनेने स्थिर राहिली. 26,490 शाळांपैकी फक्त 2,539 शाळा बंद राहिल्या, आणि 13,216 शिक्षकांनीच कामबंद आंदोलनात सहभाग घेतला. मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नागपूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा कणभरही परिणाम दिसला नाही. एकंदरीत प्राथमिक विभागात आंदोलनाचा प्रभाव जास्त तर माध्यमिक विभागात कमी असल्याचे स्पष्ट दिसून आले असून, शिक्षण विभागाने घेतलेल्या वेतन कपातीच्या निर्णयाने राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे.

Comments are closed.