महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चौथी (प्राथमिक) आणि सातवी (उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षांसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. शाळा व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ही मुदतवाढ दुसऱ्यांदा देण्यात आली असून हीच अंतिम संधी असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. यापूर्वी अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर ते १३ फेब्रुवारी अशी मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांकडून आलेल्या विनंतीनंतर अर्ज प्रक्रियेला अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे शाळांनी व विद्यार्थ्यांनी निर्धारित संकेतस्थळावरूनच नोंदणी व अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
परीक्षेत प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असे चार विषय असतील. प्रथम भाषा व गणिताचा पेपर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत, तर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर दुपारी २ ते ३.३० या वेळेत होईल. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड अशा सात माध्यमांतून घेतली जाणार आहे.

Comments are closed.