यंदा शाळेच्या मुलामुलींसाठी शिष्यवृत्तीच्या परीक्षांचं वेळापत्रक ठरलंय. पाचवी-आठवीचं पेपर ८ फेब्रुवारीला होणार असून हीच या वर्गांसाठीची शेवटची शिष्यवृत्ती परीक्षा ठरणार आहे. तर चौथी-सातवीची परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत ठेवण्यात आलीये आणि सध्या शाळांमधूनच विद्यार्थ्यांकडून अर्ज गोळा केले जातायत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितलं की, पाचवी-आठवीसाठी चार विषय असतील—प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. ही एकूण ३०० गुणांची परीक्षा आहे. नियमित शुल्कासह अर्ज २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह १ ते ३१ डिसेंबर या काळात भरता येतील.
शिष्यवृत्ती मिळाल्यास चौथीच्या हुशार विद्यार्थ्यांना वर्षाला ५,००० रुपये आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना ७,५०० रुपये मिळणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून यंदा परीक्षेचं संपूर्ण शुल्क भरून देण्याचा निर्णय घेतलाय. यावर्षी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी मिळून १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितलं की, चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम सत्र परीक्षा संपल्यानंतर मे महिन्यात होईल आणि त्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. पुढे शासनाच्या नव्या नियमानुसार फक्त चौथी व सातवीचीच शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.

Comments are closed.