पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; आता परीक्षा २२ फेब्रुवारीला! — विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! | Scholarship Exam Rescheduled; New Date Announced!

Scholarship Exam Rescheduled; New Date Announced!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मूळ वेळापत्रकानुसार ही परीक्षा ८ फेब्रुवारीला होणार होती; मात्र त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची ‘सीटीईटी’ परीक्षा असल्याने वेळापत्रकातील संघर्ष टाळण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे.

Scholarship Exam Rescheduled!

आता ही परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभर घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी अधिकृत प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या रचनेतही मोठा बदल करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे चौथी आणि सातवीऐवजी यंदा चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी— या चारही वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संधी वाढणार असून स्पर्धेतही वाढ होणार आहे.

अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक अनिवार्य असून, बँक खात्याची माहिती विद्यार्थी पात्र ठरल्यानंतर भरण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर असेल. अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील; ऑफलाइन अर्ज मान्य केले जाणार नाहीत.

शुल्क संरचनेनुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क, १ ते १५ डिसेंबरदरम्यान विलंब शुल्क, १६ ते २३ डिसेंबरपर्यंत अतिविलंब शुल्क, तर २३ ते ३१ डिसेंबरपर्यंत विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरता येतील. जिल्हा परिषद किंवा मनपा निधीतून अर्ज भरणाऱ्या शाळांनी शुल्काची रक्कम ३१ डिसेंबरपूर्वी जमा करणे बंधनकारक आहे.

या परीक्षेत पहिल्या सत्रात प्रथम भाषा आणि गणित, तर दुसऱ्या सत्रात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय घेण्यात येणार आहेत. प्रथम व तृतीय भाषा प्रत्येकी ५० गुणांंची, तर बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित प्रत्येकी १०० गुणांची परीक्षा असणार आहे.

नवीन परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासाचा अवधी मिळणार असून, सीटीईटीमुळे निर्माण झालेला अडथळा दूर झाल्याने दोन्ही परीक्षांची तयारी सुरळीतपणे करता येणार आहे.

Comments are closed.