चौथी–सातवी शिष्यवृत्ती परीक्षांची अर्जप्रक्रिया सुरू; 26 एप्रिलला राज्यभर एकाच दिवशी परीक्षा! | Class 4 & 7 Scholarship Exam Applications Open!

Class 4 & 7 Scholarship Exam Applications Open!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीची ऑनलाईन अर्जप्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांना आता अर्ज सादर करता येणार आहेत.

Class 4 & 7 Scholarship Exam Applications Open!

चौथीसाठी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तर सातवीसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यंदा ही परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी होणार असून, याबाबतची अधिसूचना www.mscepune.in आणि https://pupppssmsce.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याच संकेतस्थळांवरून विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांचे अर्ज भरता येणार आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 30 डिसेंबर ते 2 फेब्रुवारी अशी आहे.

विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 3 ते 17 फेब्रुवारी, अतिविलंब शुल्कासह 18 ते 23 फेब्रुवारी, तर अतिविशेष विलंब शुल्कासह 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 28 फेब्रुवारीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षेच्या दिवशी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत प्रथम भाषा व गणित, तर दुपारी 2 ते 3.30 या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी बिगर मागास विद्यार्थ्यांना ₹200, तर मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना ₹125 शुल्क भरावे लागेल. या शुल्कात प्रवेश व परीक्षा शुल्काचा समावेश आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम तारीख 3 मार्च आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाईन स्वरूपात भरणे अनिवार्य आहे. या परीक्षेस राज्य मंडळासह CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळांमधील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. परीक्षेतील राज्यभरातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय, तर प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या 25 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल, मात्र त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार नाही.

परीक्षेबाबतचे सर्व नियम, अटी व सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

Comments are closed.