सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्य शासनाने आता नोकरभरतीस परवानगी दिली आहे. बँकेत एकूण ५०८ पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती शासनाने मान्यता दिलेल्या कंपनीमार्फत पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे, ज्यामध्ये कोणतीही गैरव्यवहार होऊ नये, असा विश्वास अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला.
मानसिंगराव नाईक यांनी सांगितले की, राज्यातील सात ते आठ जिल्हा बँकांना भरतीस परवानगी मिळालेली असून त्यात सांगली जिल्हा बँकही आहे. या प्रक्रियेत ४४४ लिपीक आणि ६३ शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. शासनाने सहा कंपन्यांचा पॅनेल तयार केला असून, त्यांच्याकडून आवश्यक माहिती बँकेने मागवली आहे.
संचालक मंडळाने अशी कंपनी निवडली आहे ज्यांच्याविरोधात पूर्वीच्या भरती प्रक्रियेबाबत कोणतेही आरोप नाहीत आणि जी काळ्या यादीतही नाहीत. काही आरोप असले तरीही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच पार पडणार असल्याची खात्री नाईक यांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, युवकांनी कोणत्याही भ्रपशाने बळी पडू नये आणि परीक्षेसाठी योग्य प्रकारे तयारी करावी. सध्या बँकेत कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात असून, ४०० कर्मचाऱ्यांना वाढीव पदोन्नतीनंतर नवीन भरती प्रक्रिया सुरू होईल. मागील साडेतीन वर्षांपासून जिल्हा बँकचा कारभार पारदर्शक असून, नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे राज्य शासनाने भरतीस परवानगी दिली आहे.
जिल्हा बँकेत होणारी भरती पूर्णपणे नियम व प्रक्रियेनुसार पार पडणार आहे, कोणत्याही युवकाला अन्याय होणार नाही आणि शासनाने मान्यता दिलेल्या कंपनीमार्फतच भरतीची प्रक्रिया केली जाईल, असे मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट केले.