नवोदय विद्यालय प्रवेशासाठीची परीक्षा आता १३ डिसेंबर २०२५ रोजी घेणार, असं कळतंय. विशेष म्हणजे याच वर्षी १८ जानेवारी २०२५ ला २०२४-२५ साठीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे एकाच वर्षात दोन वेळा नवोदय परीक्षा होणं हे पहिल्यांदाच बघायला मिळतंय.
आता या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अवघे पाच-सहा महिनेच मिळणार आहेत, म्हणूनच गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांत मोठा गोंधळ आणि चिंता पसरलाय. आदिवासी वस्ती, दुर्गम भागात शिकणाऱ्या मुलांना एवढ्या कमी वेळात योग्य मार्गदर्शन मिळेल का, असा प्रश्न सगळीकडं विचारला जातोय.
शिक्षण क्षेत्रातले जाणकार, नवोदयसाठी तयारी करणारे शिक्षक आणि सामाजिक संस्था यांच्यातूनही यावर टीका सुरू आहे. जून-जुलैपासून शैक्षणिक सत्र सुरू होतं, आणि लगेच डिसेंबरमध्ये परीक्षा ठेवणं योग्य आहे का, हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
पूर्वी परीक्षा मार्चमध्ये व्हायची, त्यामुळे वेळ मिळायचा आणि मुलं नीट तयारी करायची. पण आता डिसेंबरमध्ये परीक्षा घेतल्यामुळे अभ्यासाचा ताण वाढण्याची भीती शिक्षक व्यक्त करतायत.
दिग्रसच्या नितीन उहाके सर म्हणाले, “परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये झाली तरच मुलांना योग्य तयारी करता येईल. ग्रामीण आणि शहरी दोघांचाही विचार झाला पाहिजे.”
यवतमाळ जिल्हा परिषद या वर्षी १००% ग्रामीण विद्यार्थी परीक्षेला बसतील, यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य वेळ आणि अभ्यासाची संधी मिळावी म्हणून परीक्षा उशिरा घेणं गरजेचं आहे, असं म्हणणं आहे.

Comments are closed.