कधी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारे अभियांत्रिकी शिक्षण, आज मात्र अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. राज्यातील तब्बल ६६ अभियांत्रिकी महाविद्यालयांतील निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.
काही कॉलेजांमध्ये तर दहा टक्क्यांहूनही कमी प्रवेश झाले असून, साताऱ्यातील एका कॉलेजात केवळ तीनच विद्यार्थी दाखल झाल्याचं चित्र आहे — आणि हे दृश्य ग्रामीण शिक्षणाच्या वेदनेचं प्रतिक ठरतंय.
उच्च शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ३७२ महाविद्यालयांतील २ लाख जागांपैकी फक्त १.६६ लाख जागा भरल्या गेल्या आहेत. म्हणजेच, जरी एकूण प्रवेश थोडा वाढला असला तरी, तो मुख्यतः शहरी भागापुरताच मर्यादित राहिला आहे.
पुणे, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूरसारख्या शहरांतील नामांकित महाविद्यालयांत ९०% पेक्षा अधिक जागा भरल्या गेल्या आहेत. अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्लेसमेंट ड्राइव्ह आणि उद्योगसंलग्न प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा कल तिकडे झुकतो आहे.
पण दुसरीकडे, नंदुरबार, बीड, अहिल्यानगर, वर्धा अशा जिल्ह्यांतील कॉलेजांमध्ये वर्ग सुरू करायलाही विद्यार्थी नाहीत. प्रयोगशाळा तयार, शिक्षक हजर, पण बाकं रिकामी — अशी परिस्थिती आहे.
शिक्षकांच्या अपुऱ्या नेमणुका, वाहतुकीच्या अडचणी आणि उद्योगजगतातील संबंधांचा अभाव ही प्रमुख कारणं सांगितली जात आहेत.
शहरी कॉलेजांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत असताना, ग्रामीण कॉलेजांच्या गेटवर शांतता आणि प्रतीक्षेचा आवाज ऐकू येतो — “कोणी तरी या… शिकायला या…”

Comments are closed.