‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE)’ कायद्यानुसार २०२६–२७ शैक्षणिक वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५३८ शाळांमधून ४,७८१ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
शाळांची नोंदणी आणि प्रवेश क्षमता निश्चित झाली असली तरी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत अद्याप स्पष्टता नाही, त्यामुळे पालक प्रतीक्षेत आहेत.
आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश देण्याची ही प्रक्रिया असते. फेब्रुवारी महिना सुरू होऊनही राज्यातील अनेक जिल्ह्यांत शाळा नोंदणी अपूर्ण असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात शहर व तालुकानिहाय पात्र शाळांची यादी आणि प्रवेशक्षमता शिक्षणाधिकारी कार्यालयातील RTE कक्षाने जाहीर केली आहे. मात्र, मागील वर्षीप्रमाणे (जानेवारीत अर्ज, फेब्रुवारीत लॉटरी) यंदा वेळापत्रक जाहीर न झाल्याने संभ्रम कायम आहे.
दरम्यान, शासनाकडील थकीत प्रतिपूर्ती न मिळाल्याने काही शाळांचा प्रतिसाद कमी असल्याची चर्चा आहे. परिणामी प्रवेश प्रक्रियेत शाळांचा सहभाग मर्यादित राहण्याची शक्यता असून, पालकांचे लक्ष आता वेळापत्रक जाहीर होण्याकडे लागले आहे.

Comments are closed.