आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला अतिरिक्त मुदत देण्याचे निर्देश दिल्यानंतर शिक्षण विभागाने अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मार्चपर्यंत वाढवली आहे.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि राज वाकोडे यांच्या खंडपीठाने शंकर आत्राम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा अंतरिम आदेश दिला. राज्य सरकारच्या १२ फेब्रुवारी २०२६ च्या निर्णयानुसार १ किमी अंतराची अट आणि फक्त १० शाळांची निवड ही अट घालण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या अटींवर तात्पुरती स्थगिती देत पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून ३ किमी परिसरातील शाळांमध्ये अर्ज करण्याची मुभा दिली.
उच्च न्यायालयाने तीन दिवसांची मुदतवाढ दिली असली तरी शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत २५% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला आठ दिवसांची वाढ जाहीर केली आहे. याआधी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च होती.
सध्या जिल्ह्यातील ७,०८१ रिक्त जागांसाठी १७,३१९ अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ही मुदतवाढ पालकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

Comments are closed.