शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. स्वयं अर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व-प्राथमिक स्तरावर 25 टक्के राखीव जागांसाठी पालकांना 17 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्यान अधिकृत पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त व भटक्या जाती, ओबीसी, एसबीसी, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित, अनाथ, दिव्यांग आणि कोविडग्रस्त बालकांचा समावेश आहे. तसेच वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांनाही आर्थिक दुर्बल गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
पालकांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडून अचूक माहिती भरावी आणि मुदतीत अर्ज पूर्ण करावा, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अडचण आल्यास आरटीई पोर्टलवरील मदत केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.