भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. Railway Recruitment Board (RRB) ने आरआरबी ग्रुप डी 2026 (CEN 09/2025) अंतर्गत तब्बल २२,१९५ लेव्हल-1 पदांसाठी अधिकृत अधिसूचना 30 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. Indian Railways मध्ये स्थिर आणि सुरक्षित करिअर शोधणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.

या भरतीअंतर्गत पॉइंट्समन-B, ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, असिस्टंट (S&T), असिस्टंट (C&W), असिस्टंट TRD, असिस्टंट लोको शेड, असिस्टंट ऑपरेशन्स आणि असिस्टंट TL & AC यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे. इंजिनिअरिंग विभागात सर्वाधिक ११,००० जागा ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV साठी जाहीर करण्यात आल्या आहेत, तर पॉइंट्समन-B साठी ५,००० पदे उपलब्ध आहेत. त्यामुळे तांत्रिक व अर्धतांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून 31 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे आणि 2 मार्च 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, प्रवर्ग, पद प्राधान्यक्रम यांची अचूक नोंद करणे महत्त्वाचे आहे.
पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. 1 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे, तर राखीव प्रवर्गांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून ITI किंवा NCVT प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवी ITI च्या पर्याय म्हणून मान्य केली जाणार नाही.
निवड प्रक्रिया चार टप्प्यांत होणार आहे. प्रथम संगणक आधारित परीक्षा (CBT) होईल, ज्यामध्ये गणित, सामान्य विज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती तसेच सामान्य जागरूकता या विषयांवर प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांची निगेटिव्ह मार्किंग असेल. त्यानंतर शारीरिक पात्रता चाचणी (PET), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांतून अंतिम निवड केली जाईल. मे 2026 मध्ये CBT परीक्षा होण्याची शक्यता आहे.
वेतनाबाबत पाहता, निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार मूलभूत वेतन ₹18,000 प्रतिमहिना मिळेल. भत्ते जसे की महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता (TA) मिळून प्रत्यक्ष हातात ₹22,500 ते ₹25,380 पर्यंत वेतन मिळू शकते. अनुभव आणि बढतीनुसार पुढील 5 ते 10 वर्षांत वेतन ₹35,000 ते ₹50,000 पर्यंत वाढू शकते. एकूणच, दीर्घकालीन स्थिरता, चांगले वेतन आणि सुरक्षित भवितव्य यासाठी ही भरती तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे.

Comments are closed.