रत्नागिरी, २४ फेब्रुवारी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने येत्या २७ फेब्रुवारी रोजी पं. Deendayal Upadhyaya यांच्या नावाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शुक्रवारी, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मिरजोळे एमआयडीसी येथील Finolex Academy of Management and Technology येथे हा रोजगार मेळावा पार पडणार आहे.
जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी ‘महास्वयंम’ वेबपोर्टलच्या माध्यमातून सहभागी होत रिक्त पदांची नोंद www.mahaswayam.gov.in वर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. युजर आयडी व पासवर्डचा वापर करून रिक्त जागा ऑनलाईन अधिसूचित कराव्यात आणि प्रत्यक्ष मेळाव्यात उमेदवारांची निवड करून त्यांना रोजगाराच्या संधी द्याव्यात, असेही सूचित करण्यात आले आहे.
ज्या आस्थापनांची नोंदणी झालेली नाही त्यांनी तत्काळ जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा. अधिकाधिक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सहायक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.

Comments are closed.