मुंबई विभागातील सुमारे 6500 शिक्षकांना त्यांच्या थकीत बिलांची 56 कोटी रुपयांची रक्कम लवकरच मिळणार आहे. शिक्षण संचालक विभागाकडे या संदर्भातील सप्लीमेंटरी बिले मंजुरीसाठी पाठविण्यात आली असून, लवकरच ती मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत बिलांसाठी प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई शिक्षण विभागात ठाणे, पालघर, रायगड तसेच दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील शिक्षकांचे विविध भत्ते व वेतन थकीत होते. एकूण 56 कोटींपेक्षा अधिक रक्कम शिक्षण संचालकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. मंजुरी मिळताच शिक्षकांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतील. मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यामुळेच ही प्रक्रिया वेगाने मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे.
शिक्षकांच्या थकीत बिलांच्या मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षण संचालकांना प्रस्ताव सादर केला आहे. शिक्षकांना वेतन व अन्य थकीत रक्कम तातडीने मिळावी यासाठी संबंधित वेतन पथक व शिक्षण निरीक्षक कार्यालयांकडे मागणी लावून धरली होती. याशिवाय, शिक्षण विभागातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक कर्मचारी उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
मुंबई शिक्षण विभागासह संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी, सेवाकाल, निवड श्रेणी आणि नियमित वेतन खंड यांसारख्या विविध प्रकरणांतील बिले अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शिक्षकांना वारंवार शिक्षण विभागाच्या चकरा माराव्या लागतात. मात्र, किरकोळ त्रुटी दाखवून त्यांना परत पाठवले जाते, यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
मुंबई आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत बिलांची मोठी रक्कम प्रलंबित आहे. मुंबई दक्षिण विभागात 14 कोटी, मुंबई पश्चिम विभागात 4 कोटी, तर मुंबई उत्तर विभागात 19 कोटींची थकबाकी आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर रक्कम प्रलंबित असून, लवकरच या बिलांना मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.