शिक्षकांना दिलासा: टीईटी ६ संधी!-Relief for Teachers: 6 TET Chances!

Relief for Teachers: 6 TET Chances!

राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी मिळालेल्या मुदतीचा विचार करता, राज्य शासन विद्यमान शासन निर्णयात बदल करण्याच्या तयारीत आहे.

Relief for Teachers: 6 TET Chances!त्यामुळे शिक्षकांना पुढील काळात तब्बल सहा वेळा ‘टीईटी’ परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियोजनानुसार, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात दोन वेळा ‘टीईटी’ होणार असून पहिली परीक्षा जूनअखेर किंवा जुलैमध्ये, तर दुसरी परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेतली जाईल. यानंतर २०२७-२८ या वर्षातील पहिली ‘टीईटी’ जूनमध्ये होणार असून निकाल ३१ ऑगस्टपूर्वी जाहीर करणे बंधनकारक राहणार आहे.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या आणि ५३ वर्षांपर्यंत वय असलेल्या सर्व शिक्षकांना दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मुदतीत पात्रता पूर्ण न झाल्यास सक्तीची सेवानिवृत्ती लागू होऊ शकते, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये मुख्याध्यापकांचाही समावेश आहे. शिवाय, पदोन्नतीसाठीही ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे अनिवार्य ठरणार आहे.

अलीकडील परीक्षांमध्ये अत्यल्प निकाल लागल्याच्या पार्श्वभूमीवर, शिक्षकांना अधिक संधी देण्यासाठी परीक्षा परिषदेने दरवर्षी दोन ‘टीईटी’ घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. आता या प्रस्तावाला राज्य सरकारकडून तातडीने मान्यता मिळणार का, याकडे राज्यातील सुमारे पावणेदोन लाख शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.