राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या ठरत असून, महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे मतदान पार पडले असून, आता दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
अशा पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा निर्णय घेतला जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. महिलांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक आधार मजबूत करण्याच्या उद्देशाने पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एकाच वेळी दोन हप्ते जमा केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा लाभ दिला जातो. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आधीच महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा असतानाही अद्याप त्याबाबत हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे आता दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
महिला व बालविकास विभागाकडून याबाबत तयारी सुरू असल्याची माहिती काही प्रतिष्ठित मीडिया अहवालांमधून समोर आली आहे. १५ डिसेंबरनंतर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने, त्यापूर्वीच लाडक्या बहिणींना दोन हप्ते देण्यात येतील, अशी चर्चा आहे. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या योजनेसाठी केवायसी करणे बंधनकारक असून, ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी न केल्यास भविष्यात हप्ते थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळेत केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.