फेब्रुवारी–मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासकीय रेखा ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शास्वीय कला, चित्रकला व लोककला या विषयांच्या वाढीव गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास अतिरिक्त १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेच्या गुणांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा ग्रेड परीक्षांचा निकाल जानेवारी २०२६ च्या अखेरच्या आठवड्यात जाहीर झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाने यंदापासून प्रथमच इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांचे वाढीव कलागुणांचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याची व्यवस्था सुरू केली. मात्र, संबंधित ऑनलाइन संकेतस्थळावर वारंवार तांत्रिक अडचणी व एर येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वेळेत प्रस्ताव सादर करता आले नाहीत.
या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे वाढीव कलागुण धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. याबाबत कलाशिक्षक महासंघाने संकेतस्थळ दुरुस्त करून प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख वाढवावी, अशी ठाम मागणी केली होती. या विषयावर ‘सकाळ’मध्ये ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत राज्य शिक्षण मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांच्या स्वाक्षरीचे पत्र नाशिक विभागीय शिक्षण मंडळाला प्राप्त झाले असून, त्यानुसार कला विषयांचे ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेतील कौशल्यासाठी मिळणारे वाढीव गुण गमावण्याचा धोका टळला आहे.
या निर्णयाबद्दल विभागातील मुख्याध्यापक, कलाशिक्षक व विविध कलाशिक्षक संघटनांच्या वतीने प्रल्हाद हस्तेकार, प्रल्हाद साळुंखे, चंद्रशेखर सावंत, दत्तात्रय सांगळे, सचिन पगार, मिलिंद टिळे, राजेंद्र लोखंडे, प्रदीप अहिरे व प्रशांत इंप्पर यांनी ‘सकाळ’ माध्यम समूहाचे आभार व्यक्त केले आहेत.

Comments are closed.