नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी यंदा अभूतपूर्व स्पर्धा पाहायला मिळत असून, महाराष्ट्रात सर्वाधिक परीक्षार्थी नोंदणी करणारा जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगर पुढे आला आहे. जिल्ह्यातील कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी एका जागेसाठी तब्बल सुमारे २५० विद्यार्थी स्पर्धेत आहेत. येत्या शनिवार, १३ डिसेंबर रोजी ही प्रवेश परीक्षा होणार असून, यासाठी जिल्ह्यातून एकूण १९,३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील काही वर्षांतील ही सर्वाधिक संख्या मानली जात आहे.

राज्यातील ३५ जिल्ह्यांत प्रत्येकी एक नवोदय विद्यालय असून, प्रत्येक शाळेत इयत्ता सहावीसाठी ८० जागा उपलब्ध असतात. यापैकी ७५ टक्के जागा ग्रामीण भागातील तर २५ टक्के जागा शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. नवोदय प्रवेशासाठी दरवर्षी मोठी चुरस असते; मात्र यंदा राज्यात सर्वाधिक स्पर्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात ५२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये शहरातील ११ तर ग्रामीण भागातील ४१ केंद्रांचा समावेश आहे. परीक्षेच्या नियोजनाबाबत शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असून, संबंधित अधिकारी व नवोदय विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवोदय परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळते. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जावे यासाठी प्रोत्साहन दिले गेले, असे शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी सांगितले. याच प्रयत्नांमुळे यंदा जिल्ह्यातून राज्यातील सर्वाधिक नोंदणी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
जवाहर नवोदय विद्यालय ही भारत सरकारची निवासी शाळा असून, येथे विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. इयत्ता सहावी व नववीसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा १३ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

Comments are closed.