राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेला रेशन दुकानांमधील साखरेचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. विशेषतः अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धान्यासोबत आता पुन्हा साखरही वितरित केली जाणार आहे.

यानुसार, प्रत्येक अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबाला प्रतिमहा एक किलो साखर मिळणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ तसेच जानेवारी २०२६ या तीन महिन्यांसाठी साखरेचे अधिकृत नियतन मंजूर करण्यात आले आहे. टेंडर प्रक्रियेत आलेल्या अडचणींमुळे गेल्या दीड वर्षांपासून रेशन दुकानांतून साखर मिळत नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ८७ हजारांहून अधिक अंत्योदय कार्डधारक कुटुंबांना बाजारातून जास्त दराने साखर घ्यावी लागत होती.
सण-उत्सवांच्या काळात गोड पदार्थ बनवण्यासाठी लागणारी साखर बाजारात प्रतिकिलो ४४ ते ४६ रुपयांच्या दराने विकली जात होती. मात्र आता रेशन दुकानांतून हीच साखर अवघ्या २० रुपये प्रतिकिलो दरात उपलब्ध होणार असल्याने गरजू आणि गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. सणासुदीच्या काळात घराघरात पुन्हा गोड पदार्थ तयार करण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरणार आहे.
लाभार्थ्यांना पुन्हा साखरेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे पाच हजार क्विंटल साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. ही साखर जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात दाखल झाली असून, वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
सध्या काही ठिकाणी एक महिन्याचे वाटप सुरू झाले असून, पुढील काही दिवसांत सर्व रेशन दुकानांतून साखरेचे वितरण पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. दीड वर्षांनंतर पुन्हा मिळणाऱ्या या साखरेमुळे अंत्योदय कुटुंबांच्या घरात नववर्षापूर्वीच गोडवा परत येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Comments are closed.