सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने कडक पडताळणी मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मिळणारे रेशन फक्त पात्र व गरजू कुटुंबांपर्यंतच पोहोचावे, यासाठी आता थेट तपासणी आणि डिजिटल छाननी केली जाणार आहे.
या प्रक्रियेत बनावट, अपात्र किंवा चुकीच्या नोंदी असलेली नावे थेट यंत्रणेतून वगळली जाणार आहेत.या मोहिमेचा मुख्य आधार म्हणजे रेशन कार्ड eKYC. आता आधारशी रेशन कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ज्या कार्डधारकांनी eKYC पूर्ण केलेली नाही, त्यांचे नाव ३१ डिसेंबर २०२५ नंतर रेशन यादीतून काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून गावोगाव आणि शहरांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे अपात्र लाभार्थी बाजूला पडतील, रेशनचा अपव्यय थांबेल आणि खऱ्या गरजू कुटुंबांना वेळेवर व पूर्ण धान्य मिळेल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
eKYC म्हणजे काय?
eKYC ही आधारवर आधारित डिजिटल ओळख पडताळणी प्रक्रिया आहे. यामध्ये बोटांचे ठसे किंवा डोळ्यांच्या स्कॅनद्वारे लाभार्थ्याची ओळख निश्चित केली जाते. eKYC न झाल्यास रेशन वितरण थांबवले जाऊ शकते.
eKYC कशी कराल?
लाभार्थ्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन रेशन कार्ड व कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड सोबत न्यावे. दुकानदाराकडील POS मशीनवर बायोमेट्रिक पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण केली जाते.

Comments are closed.