राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी आधार क्रमांक जोडण्याची (ई-केवायसी) अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या निर्णयामुळे अनेक लाभार्थींना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात अजूनही लाखो शिधापत्रिका धारकांना आधार लिंक करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण भागात मोठ्या अडचणी
2011 मध्ये आधार कार्ड नोंदणी सुरू झाली, मात्र त्यावेळी घेतलेले आधार कार्डवरील फोटो आणि सध्याचा चेहरा यामध्ये मोठा फरक आल्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया करताना अडथळे निर्माण होत आहेत. आधार कार्डवरील फोटो जुना असल्याने ई-केवायसी करताना तो ओळखला जात नाही. परिणामी आधार क्रमांक जोडण्याची प्रक्रिया अपूर्ण राहते. यामुळे अनेक शिधापत्रिका धारकांना आधार सेंटरवर जाऊन फोटो अपडेट करावा लागत आहे.
इंदापूरसारख्या ठिकाणी आधार केंद्रांवर फोटो अपडेट करण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. वेळेवर अपडेट न झाल्यास लोकांना पुन्हा पुन्हा आधार केंद्रांना भेट द्यावी लागत आहे, यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जात आहेत.
“मेरा ई-केवायसी” अॅपद्वारेही अडथळे
शासनाने आधार लिंकिंगसाठी “मेरा ई-केवायसी” हे मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या अॅपवर आधार कार्डवरील फोटो आणि विद्यमान फोटो यामध्ये तफावत असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिणामी, लाभार्थींना पुन्हा आधार केंद्र गाठावे लागते.
अशिक्षित लाभार्थ्यांचा गोंधळ आणि ससेहोलपट
ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक शिधापत्रिका धारक हे अशिक्षित असल्यामुळे त्यांना ही प्रक्रिया समजणे कठीण जात आहे. त्यातच आधार केंद्रांवरील तांत्रिक समस्या आणि मोठ्या रांगा यामुळे लोकांचा गोंधळ उडत आहे. रेशन वितरकांकडूनही विशेष मदत मिळत नसल्याने लाभार्थ्यांना अपूर्ण प्रक्रियेमुळे अन्नधान्याचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत.
शिधापत्रिका धारकांची मागणी – रेशन दुकानदारांनी मदत करावी
शिधापत्रिका धारकांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आणि शासनाकडे मागणी केली आहे की, आधार लिंकिंगसाठी रेशन दुकानदार आणि नागरी पुरवठा यंत्रणेकडून मदत मिळावी. रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, जेणेकरून कोणीही या प्रक्रियेत अडकून राहू नये आणि गरजू लोकांना त्यांचा शिधा वेळेवर मिळावा.
31 मार्चपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे
सरकारने आता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असली, तरी लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर आधार लिंकिंग पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा, निर्धारित वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शिधापत्रिकेवरील लाभ बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर त्यांच्या आधार क्रमांकाची पडताळणी करून आवश्यक अपडेट्स पूर्ण करावेत.