सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्लेसमेंट सेल येत्या तीन महिन्यांत सर्व सुविधांसह कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली. प्लेसमेंट सेलसाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नेमणूक केली जाणार असून, विद्यार्थ्यांच्या रोजगार संधींमध्ये सुधारणा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अधिसभा सदस्यांनी प्लेसमेंट सेल बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. मनुष्यबळाच्या अभावामुळे प्लेसमेंट प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. या समस्येवर दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सदस्यांनी सांगितले. यावर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
डॉ. गोसावी म्हणाले, “प्लेसमेंट सेलसाठी त्वरित तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस योजना तयार केली जात आहे.”
तसेच, विद्यापीठात नवीन सॉफ्टवेअर विकसित करून विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र आणि ट्रान्सक्रिप्ट वितरण प्रक्रियेत सुलभता आणली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांचा डेटा संकलित केला जाईल, असे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.
दरम्यान, इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील नव्याने तयार झालेल्या सभागृहाला “धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सभागृह” असे नाव देण्याचा ठराव अधिसभेत मंजूर करण्यात आला. संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.