महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) २०२५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या ३९२ जागा जाहीर झाल्या असल्या, तरी वयोमर्यादेचा प्रश्न हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा ठरत आहे.
४ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदाची विशेष संधी द्यावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
या मागणीसाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील अनेक भागांत आंदोलन सुरू असून, वयोमर्यादा वाढवली नाही तर लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय न झाल्यास राज्यातील जवळपास एक लाख उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहू शकतात.
पीएसआय जाहिरात तब्बल सात महिने उशिराने आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेबाहेर गेले, हा सरकारचाच दोष असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचेही या आंदोलनाला समर्थन मिळाले असून, विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, एमपीएससीने प्रवेशपत्रे व परीक्षेसंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्याने संभ्रम अधिक वाढला आहे. वयोमर्यादेबाबत तातडीने शासन निर्णय (जीआर) काढावा, अशी विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे. अन्यथा, मेहनत, खर्च आणि वर्षानुवर्षांची तयारी वाया जाण्याची भीती उमेदवार व्यक्त करत आहेत.

Comments are closed.