महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) २०२५ मध्ये एकूण ६७४ पदांची भरती जाहीर झाली असून, त्यापैकी ३९२ पदे पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी आहेत.
मात्र जाहिरात उशिरा निघाल्याने अनेक उमेदवार वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर परीक्षार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेऊन वयोमर्यादा सवलतीचा मुद्दा मांडला. परीक्षेची जाहिरात नेहमीप्रमाणे डिसेंबर-जानेवारीऐवजी २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून परीक्षा थेट २१ डिसेंबर २०२५ ला होत आहे. तसेच वयोमर्यादा मोजण्याची तारीख १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने अनेक विद्यार्थ्यांचे वय काही महिन्यांनी जास्त ठरले आहे.
यापूर्वी पोलीस भरती आणि संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये सरकारने एक वर्षाची वयोमर्यादा सवलत दिली होती. त्याच धर्तीवर PSI उमेदवारांनाही दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल” असे आश्वासन दिल्याने हजारो परीक्षार्थ्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

Comments are closed.