राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेला अखेर गती मिळणार आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असून, आता येत्या महिन्याभरात विषयानुसार पदांचे ठराविक वाटप केले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

मंगळवारी (दि. ९) विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले की, प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला जाणार आहे. त्याद्वारे कोणत्या विषयासाठी किती प्राध्यापकांची आवश्यकता आहे, हे निश्चित करून भरतीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मात्र, या प्रक्रियेस अजून काही काळ लागणार असल्याने उमेदवारांना प्रत्यक्ष भरतीसाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आमदार जयंत आजगावकर यांनी विधान परिषदेत प्राध्यापकांच्या कॅस (CAS) संदर्भात तसेच महाविद्यालयातील शिक्षक भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री पाटील यांनी वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती देत, विषयनिहाय पदवाटप येत्या महिन्यात पूर्ण करण्याचे स्पष्ट केले.
यासोबतच, विद्यापीठातील विविध पदांच्या भरतीसाठी पूर्वी ठरवण्यात आलेल्या निकषांमध्ये बदल करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. माजी राज्यपालांच्या आदेशानुसार तयार केलेल्या ७०:३० सूत्राऐवजी ६०:४० करण्याबाबत सध्याच्या राज्यपालांशी चर्चा सुरू असून, ५०:५० सूत्र लागू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
याला मान्यता मिळाल्यास विद्यापीठातील सुमारे ७५० प्राध्यापकांच्या भरतीच्या निकषांमध्ये बदल होणार असून, भरती प्रक्रियेला अधिक पारदर्शकता येणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.