राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्राध्यापक भरती प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे!महाराष्ट्रातील १२ शासकीय विद्यापीठांतील तब्बल ६५९ प्राध्यापक पदे आणि ११०० अनुदानित महाविद्यालयांतील ५०१२ पदे जून २०२६ पूर्वी भरण्याची तयारी सुरू झाली आहे.ही माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मागील दीड वर्षांपासून राज्यपालांच्या काही कठोर अटींमुळे ही भरती थांबली होती. त्या काळात विद्यापीठांच्या रँकिंगमध्येही घसरण झाली होती. अखेर आता या अटींचा फेरविचार करून, नव्या जाहिरातींद्वारे उमेदवारांना अर्ज अद्ययावत करण्याची व नव्याने अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे.
मंत्र्यांनी सांगितले की, १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान अर्ज पडताळणी व निकष सवलतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
याचबरोबर, राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील ५०१२ प्राध्यापक पदे भरण्याला देखील परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरतीस हिरवा कंदील देत वित्त विभागाला तत्काळ आदेश दिले आहेत.
नव्या शैक्षणिक वर्षाआधी म्हणजेच जून २०२६ पर्यंत ही भरती पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना प्राध्यापक पदावर नोकरीची मोठी संधी मिळणार आहे!

Comments are closed.