राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीची प्रक्रिया आणखी काही काळ लांबणीवर जाणार आहे. कारण, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी नवीन अध्यादेश काढत भरतीचे निकष बदलले आहेत.
या नव्या नियमांनुसार आता पीएच.डी., नेट/सेट पात्रता तसेच संशोधन पेपरलादेखील गुण देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक विद्यापीठांनी दीड वर्षांपूर्वीच प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवून त्यांची छाननीदेखील पूर्ण केली होती. मात्र या काळात अनेक उमेदवारांनी पीएच.डी. पूर्ण केली, नेट-सेट उत्तीर्ण झाले किंवा नवीन रिसर्च पेपर प्रकाशित केले. त्यामुळे त्यांच्या वाढलेल्या पात्रतेचा विचार करणे विद्यापीठांसाठी आता बंधनकारक ठरणार आहे.
यामुळे विद्यापीठांना उमेदवारांना अर्जात दुरुस्तीची संधी पुन्हा द्यावी लागणार असून, जे उमेदवार आता नव्याने पात्र झाले आहेत पण अर्ज करू शकले नाहीत, त्यांनाही संधी देण्यासाठी भरतीची नवी जाहिरात काढावी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, भरती प्रक्रिया आणखी काही महिने पुढे ढकलली जाणे निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, निवडणूक आचारसंहिता, विद्यार्थीसंख्या कमी होणे, काही विषयांच्या पदमान्यतेचा मुद्दा आणि प्रशासकीय विलंब या कारणांमुळेही भरतीची गती कमीच राहणार आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसमोर आणखी प्रतीक्षेचे चित्र निर्माण झाले आहे.

Comments are closed.