महाराष्ट्रातील प्राध्यापक भरती प्रक्रियेला आता महत्त्वाचं वळण मिळालं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी चालू असलेल्या भरतीस १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता उमेदवारांना १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून, २४ नोव्हेंबरपर्यंत हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम मुदत आहे.
ही भरती प्रक्रिया अर्ज समर्थ पोर्टलद्वारे राबवली जात असून, अर्जदारांनी ‘ATR’ फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह हार्ड कॉपी सादर करणे आवश्यक आहे. एकूण ७३ शिक्षक पदांसाठी ही भरती असून, एप्रिल २०२५ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तथापि, अर्जात त्रुटी असल्यास त्या आता सुधारता येतील.
विद्यापीठात मंजूर असलेल्या २८९ पदांपैकी १५९ पदे सध्या रिक्त आहेत. आतापर्यंत या भरतीसाठी ५,०२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्पर्धेत आघाडी मिळविण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, विद्यापीठातील अधिष्ठाता (४ पदे), संचालक (५ पदे) यांसारख्या संवैधानिक अधिकारी पदांसाठीही मुदतवाढ देण्यात आली असून, या पदांसाठीही १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील

Comments are closed.