महिला व बाल विकास विभागाच्या (WCD) प्रोबेशन ऑफिसर भरती परीक्षेचा पेपर फुटल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. टीसीएस (TCS) या खाजगी संस्थेमार्फत फेब्रुवारी 2025 मध्ये ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती.
मात्र, परीक्षेदरम्यान मायक्रो कॅमेऱ्यांद्वारे प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून बाहेर पाठवण्यात आले, असे पुरावे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे सादर झाले आहेत. त्यामुळे ही फसवणूक शंभर टक्के सिद्ध झाल्याचे दिसते.
या घटनेवर काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटलं, “सरकारला वारंवार सावध केलं तरी पेपरफुटी थांबवण्यात अपयश आलं. अनेक टोळ्या सक्रिय असूनही एकही परीक्षा सुरक्षित ठेवता आली नाही. हे सरकार आणि गृहमंत्री पूर्णपणे निष्क्रिय आहेत.” शिंदे यांनी असा सवालही उपस्थित केला की, “MPSC परीक्षा घेण्यास तयार आहे, मग सरकारला या खाजगी कंपन्यांकडून काय अपेक्षा आहे?”
शिंदे पुढे म्हणाले, “मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावं. पेपरफुटीचं संपूर्ण जाळं कार्यरत आहे. आमच्याकडे या टोळ्यांची संपूर्ण माहिती आहे. सरकारने जर खरोखर तपास करायचा असेल तर आम्ही सर्व पुरावे देण्यास तयार आहोत. मात्र, सर्व परीक्षा तत्काळ MPSC कडे सुपूर्त कराव्यात.”
यावरून फडणवीस यांच्या गृहमंत्रिपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. “गेल्या काही वर्षांत 200 पेक्षा अधिक पेपरफुटीच्या घटना घडल्या, पण एकाचाही तपास पूर्ण झाला नाही,” असा आरोप शिंदे यांनी केला. त्यांनी पुढे मागणी केली की, “या सर्व गुन्ह्यांचा एकत्रित तपास करण्यासाठी विशेष तपास विभाग (Special Cell) स्थापन करावा, अन्यथा विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होईल.”