केज तालुक्यातील ग्रामपातळीवरील प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली आहे. अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोडतीत केज तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदांसाठी गावनिहाय व प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले.

ही सोडत आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे व अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांच्या उपस्थितीत पार पडली.
अंबाजोगाई उपविभागातील पोलीस पाटील पदासाठी २०२ बिंदूंची सरळसेवा भरती बिंदुनामावली प्रमाणित करण्यात आली असून, त्यानुसार ३० टक्के महिला आरक्षणासह सर्व प्रवर्गांसाठी रिक्त पदांची विभागणी जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठीच्या तरतुदीनुसार मराठा समाजासाठी (SEBC) १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
या आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (ब, क, ड), इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) तसेच खुल्या प्रवर्गासाठी स्वतंत्रपणे गावांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रवर्गात महिलांसाठी आरक्षित गावांचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील सौदाना, इस्थळ, साळेगाव, बोबडेवाडी, रामेश्वरवाडी, केकणवाडी, गप्पेवाडी, जवळबन, उंदरी, पिराचीवाडी, केकतसारणी, घाटेवाडी आदी अनेक गावांचा समावेश विविध प्रवर्गांखाली करण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस पाटील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आपल्या गावासाठी कोणते आरक्षण लागू आहे हे स्पष्टपणे समजणार असून भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे.
ही आरक्षण सोडत जाहीर झाल्याने केज तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेतील अनिश्चितता दूर झाली असून, लवकरच पुढील टप्प्यात अर्ज प्रक्रिया व भरती वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.