राज्यात आता पोलिस खात्यात कामकाजाची पद्धत झपाट्यानं बदलतेय. पूर्वी रजा किंवा कुठल्या अर्जासाठी कागदावर विनंती लिहून लिपिकांकडे द्यावी लागायची आणि मंजुरीसाठी दिवसन्दिवस थांबावं लागायचं.
पण आता ही जुनी पद्धत बाजूला पडून, आधुनिक ‘ई-रिक्वेस्ट’ प्रणाली सुरु झालीये. ‘ई-एचआरएमएस’ च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया कागदविरहित बनली असून, पोलिसांच्या सर्व सेवासंबंधी माहिती ऑनलाईन उपलब्ध होतेय.
यानं अंमलदारापासून ते उच्च अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचं प्रोफाइल पूर्णपणे डिजिटल झालंय. सुट्ट्या, बक्षिसं, बदली यासारखी माहिती एका क्लिकवर दिसते. सर्व पोलिस घटकांमध्ये ‘ई-ऑफिस’चा वापर अनिवार्य करण्यात आलाय. आदेशांवर आता आयुक्त, उपायुक्त ते सहाय्यक आयुक्त—सगळेच अधिकारी ई-स्वाक्षरी करून आदेश देत आहेत. यामुळे कामाचा वेग तर वाढलाच, शिवाय पारदर्शकता देखील प्रचंड वाढलीये.
रजा मंजुरी प्रक्रियेतही मोठा बदल झाल्याचं दिसतंय. रजेवर जाण्यापूर्वी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याने ‘ई-रिक्वेस्ट’ टाकणं बंधनकारक झालंय. त्यात रजेचा प्रकार, कालावधी, मुख्यालय सोडत असल्यास कुठे जाणार आणि कोणत्या कारणाने जातंय—हे सर्व ऑनलाइन नमूद केलं जातं. ही विनंती प्रथम हजेरी मास्तर किंवा कामकाज प्रमुखांकडे जाते. त्यांच्याकडून शिफारस झाल्यानंतर ती संबंधित विभाग प्रमुखांकडे जाते आणि शेवटी डिजिटल मंजुरी मिळते.
या संपूर्ण प्रक्रियेचं खास वैशिष्ट्य म्हणजे कागदांचा पूर्णपणे बंदोबस्त! सर्व पत्रव्यवहार, सूचना, आदेश ई-फॉर्ममध्ये संग्रहित होत असल्याने संपूर्ण पोलिस खात्यात डिजिटायझेशन जलदगतीनं होतंय. अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत—नियुक्तीपासून वेतनापर्यंतची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असल्यामुळे पोलिस दल ‘कॉपोरेट स्टाईल’मध्ये काम करण्याच्या दिशेनं मोठी झेप घेतानं दिसतंय.

Comments are closed.