महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अंतर्गत, राज्य पोलिस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात तब्बल १५ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये गृहरक्षक दल (होमगार्ड) सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी ५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

सध्या पोलिस दलासोबत बंदोबस्त व नाकाबंदीच्या कामांवर असलेले अनेक होमगार्ड तरुण ‘खाकी’ परिधान करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० शिपाई, ५२ चालक, आणि कारागृह विभागात ११८ शिपाई अशी एकूण ३८० जागांची भरती होत आहे.
गृह मंत्रालयाने राज्यभरात १५ हजार पोलिस पदे भरण्याची घोषणा केल्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. नियमित सराव करणारे तसेच वयोमर्यादा ओलांडण्याआधी संधी मिळवू पाहणारे उमेदवार आता जोमाने तयारी करत आहेत.
सन २०२३ मध्ये नाशिक पोलिसांत १५०, तर २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाली होती. त्या भरतीतील कर्मचारी सध्या पोलिस ठाण्यांमध्ये सेवेत आहेत. त्यामुळे नव्या भरतीसाठी बारावीपासून उच्च पदवीधर उमेदवारांपर्यंत सर्वचजण अर्ज नोंदणीसाठी उत्सुक आहेत.
भरती प्रक्रिया (ग्रामीण पोलिस विभागासाठी):
- अर्ज नोंदणीसाठी संकेतस्थळ www.nashikruralpolice.gov.in
- उमेदवार एकाच घटकासाठी एकच अर्ज करू शकतील
- ५० गुणांची शारीरिक चाचणी प्रथम घेतली जाईल
- प्रत्येक पदासाठी शारीरिक चाचणीनंतर १० उमेदवारांची निवड
- त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा
- दोन्ही परीक्षांतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल
- शेवटी कागदपत्र पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल
ही भरती प्रक्रिया सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांचा मजबूत बळकटीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Comments are closed.