राज्यातल्या शासकीय आयटीआय कॉलेजांत आजपासून नव्याकोऱ्या अल्पमुदतीच्या कौशल्यवर्धक कोर्सेसना सुरुवात झालीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता या कोर्सेसचं ऑनलाइन उद्घाटन पार पडलं. आता मुला-मुलींना अगदी कमी कालावधीत उद्योगांसाठी उपयोगी कौशल्य शिकता येणार आहे.
या प्रशिक्षणात अनुभवी प्रशिक्षक शिकवणार असून, आधुनिक मशिनरीवर प्रत्यक्ष काम करण्याची पण संधी मिळणार आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून प्रमाणपत्र मिळणार आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यासाठीही मार्गदर्शन दिलं जाणार आहे.
एकूण १९ कोर्सेस ठेवले आहेत — जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट, क्लाउड सपोर्ट इंजिनिअर, ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेईकल मेंटेनन्स टेक्निशियन, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन, सीएनसी ऑपरेटर, मोबाईल हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन वगैरे. हे कोर्सेस ६४ ते ६०० तासांपर्यंत चालणार असून, आठवी किंवा दहावी पास विद्यार्थी पात्र आहेत.
अधिक माहिती आणि प्रवेशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय आयटीआयशी संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराचं दार उघडणारं हे प्रशिक्षण अनेक तरुणांसाठी संधी ठरणार आहे.