मुंबईतील बोरीवली परिसरात राहणाऱ्या ७२ वर्षीय निवृत्त महिलेची सायबर चोरांनी मोठी फसवणूक केली. बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करून २००८ मध्ये निवृत्त झालेल्या या महिलेच्या पेन्शन खात्यातील सुमारे १७ लाख रुपये काही मिनिटांत लंपास करण्यात आले.

अनोळखी क्रमांकावरून फोन करून स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. पेन्शनधारकांसाठी विशेष सवलतीचे कार्ड उपलब्ध असून औषधे व इतर खरेदीवर मोठ्या सवलती मिळतील, असे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी मोबाईलवर एपीके फाइल पाठवून त्यामध्ये वैयक्तिक माहिती व ओटीपी भरण्यास सांगितले.
महिलेने दिलेल्या सूचनांनुसार तपशील भरताच संबंधित व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर ‘स्क्रीन शेअर’द्वारे ताबा मिळवला. फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवत काही मिनिटांतच त्यांच्या खात्यातील सुमारे १७ लाख रुपये परस्पर वळवण्यात आले. या प्रकारानंतर सायबर गुन्ह्यांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments are closed.