पेडणे आरोग्य केंद्रातील रिक्त पदांचा गंभीर प्रश्न! | Pedne Health Centre Vacancies Crisis!

Pedne Health Centre Vacancies Crisis!

पेडणे सामुदायिक आरोग्य केंद्रात तब्बल ५९ मंजूर पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रिक्त पदांमुळे स्थानिक रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नाहीत. परिणामी, गंभीर रुग्ण आणि गर्भवती महिलांना तपासणी व उपचारासाठी म्हापसा जिल्हा रुग्णालय किंवा बांबोळी येथील ‘गोमेकॉ’वर अवलंबून राहावे लागत आहे.

Pedne Health Centre Vacancies Crisis!

नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात ‘आप’ पक्षाचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने या रिक्त पदांची माहिती दिली. पेडणे सीएचसीमधील रिक्त पदांमध्ये एक वरिष्ठ सर्जन, दोन कनिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ, एक कनिष्ठ भूलतज्ज्ञ, एक कनिष्ठ फिजिशियन, एक कनिष्ठ सर्जन, एक बालरोग तज्ज्ञ, चार वैद्यकीय अधिकारी, होमिओपॅथिक फिजिशियन, आहारतज्ज्ञ, नऊ स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पाच महिला व दोन पुरुष एमपीएचडब्ल्यू, मुख्य लिपिक, एलडीसी, स्वयंपाकी, ड्रायव्हर आणि १७ मदतनीस यांचा समावेश आहे.

काही स्थानिक नागरिकांच्या मते, पूर्वी हे केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र असताना येथे प्रसूती व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध होत्या. मात्र, आता कर्मचारी अपुऱ्या असल्यामुळे स्त्रीरोग आणि बालरोग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची सेवा पूर्णपणे बंद पडली आहे.

यामुळे पेडणे तालुक्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गंभीर आजाराचे रुग्ण, आपत्कालीन स्थितीतील महिला किंवा बालकांना अनेक किलोमीटर अंतरावरील म्हापसा किंवा बांबोळी येथे नेले जाते. या प्रवासामुळे रुग्णांची गैरसोय तर होतेच, पण कधी कधी जीव धोक्यात येतो.

तुये हॉस्पिटल कृती समितीचे अध्यक्ष जुझे लोबो यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून पेडणे सीएचसीमध्ये पुरेशा संख्येने डॉक्टर नाहीत. सरकारने मंजूर केलेल्या पदांची तत्काळ भरती करून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात. हे आरोग्य संचालकाचे कर्तव्य आहे.”

पेडणे तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे की, या इस्पितळाची इमारत बांधून आठ वर्षे झाली. ती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्याची योजना होती. मात्र, त्या ऐवजी इथे आधीपासून असलेल्या सेवा देखील बंद केल्या जात आहेत.

आरोग्य विभागाने त्वरित पावले उचलून बंद असलेल्या वैद्यकीय सेवा पुन्हा सुरू कराव्यात आणि रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा पेडणेतील रुग्णांचे हाल आणखी वाढतील.

Comments are closed.