राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील हजारो क्रीडा शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक क्रीडा शिक्षक निवृत्त झाल्यामुळे आणि नवीन शाळा सुरू झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे.
पालक आणि शिक्षक संघटनांकडून शासनाकडे रिक्त पदे तातडीने भरावीत अशी जोरदार मागणी होत आहे. प्रत्येक वर्षी जवळपास चार हजार क्रीडा शिक्षक सेवानिवृत्त होतात, परंतु त्यांच्या जागा वेळेवर भरल्या जात नाहीत. परिणामी, अनेक शाळांमध्ये क्रीडा उपक्रम थांबले असून विद्यार्थ्यांचा खेळांकडे कल कमी झाला आहे.
क्रीडा संस्कृती कमजोर होत असल्याने वार्षिक क्रीडा स्पर्धा, व्यायामशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांवरही परिणाम दिसून येतो. यामुळे राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार होण्याचे प्रमाण घटले आहे.
पालक प्रविण राठोड यांचे म्हणणे आहे, “क्रीडा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक विकास थांबत आहेत. खेळातून शिस्त, टीमवर्क आणि नेतृत्वगुण वाढतात, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही.”
तर श्रीकांत भरले, (संस्थापक, ट्रॉय पब्लिक इंग्लिश मिडियम स्कूल, हत्तूर) यांनी सांगितले की, “लहान वयातच क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी घडतात. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरली पाहिजेत.” कला आणि क्रीडा शिक्षक संघटनेकडून शासनाला विनंती करण्यात आली आहे की, जसे विषय शिक्षकांची भरती झाली, तसेच क्रीडा शिक्षकांचीही पदे तातडीने भरावीत, जेणेकरून शालेय स्तरावर पुन्हा क्रीडा संस्कृती बहरात येईल.

Comments are closed.