यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या हिवाळी परीक्षांच्या नवीन तारखा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याआधी ११, १४, १५ आणि १६ जानेवारी रोजी नियोजित असलेले पेपर आता अनुक्रमे २२, २३, २४ आणि २५ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तसेच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. आता सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास दिलासा मिळाला आहे.
मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये समाजातील विविध घटकांतील विद्यार्थी सहभागी होत असून, यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, पोलीस, सैनिक, शिक्षक, गृहिणी आणि कामगारांचा समावेश आहे. या परीक्षेत विविध विषयांच्या सुमारे ६.७९ लाख उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार आहेत.
परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पार पडाव्यात यासाठी विद्यापीठाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. राज्यभरातील २६९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून, यासाठी एकूण १.४९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

Comments are closed.