नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील १२१ अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा आज, बुधवार (७ जानेवारी) पासून सुरू झाल्या आहेत. मात्र, ११, १४, १५ आणि १६ जानेवारी रोजी होणाऱ्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार या परीक्षा अनुक्रमे २२, २३, २४ आणि २५ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील नियमित विद्यार्थ्यांच्या सत्र व वार्षिक परीक्षा, तसेच मे २०२५ च्या सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या फेरपरीक्षार्थींच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्यभरातील २६९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा पार पडणार असून, यासाठी १ लाख ४९ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग ‘क’ परीक्षा ११ जानेवारीला होणार असून, तसेच सार्वत्रिक महापालिका निवडणुकांअंतर्गत १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी असल्यामुळे परीक्षा तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरदार, व्यावसायिक, पोलीस, सैनिक, गृहिणी, शिक्षक आणि कामगार अशा समाजातील विविध घटकांतील आहेत. या परीक्षांमध्ये एकूण ६ लाख ७९ हजार ९५४ उत्तरपत्रिका लिहिल्या जाणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

Comments are closed.