महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी परदेशात करिअर घडविण्याची सुवर्णसंधी तयार झाली आहे. महाराष्ट्र आणि जर्मनीमधील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे. या करारामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरच्या संधी मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना भाषा प्रशिक्षण, कौशल्य विकास, प्रमाणपत्र मान्यता आणि जर्मनीत नोकरी स्वीकारताना विशेष सुविधा व संरक्षण मिळेल, ज्यामुळे उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेची खात्री होईल.

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, “या कराराचा केंद्रबिंदू प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाची निर्मिती आहे. दोन्ही राज्यांतील नर्सिंग शिक्षणसंस्था, विद्यापीठे आणि प्रशिक्षण केंद्रांदरम्यान विद्यार्थी-प्राध्यापक आदान-प्रदान, संयुक्त प्रशिक्षण, अभ्यासदौरे आणि संशोधन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा उद्देश आहे.”
या कराराद्वारे कौशल्याधारित आरोग्यसेवा विस्तारणे, संशोधनाला चालना देणे, तसेच परदेशी रोजगारसंधी उपलब्ध करणे या बाबींवर विशेष भर दिला जात आहे. यामुळे तरुणांना जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक प्रशिक्षित व सक्षम होईल.
बाडेन-वुटेमबर्ग राज्याच्या प्रतिनिधी मंडळाने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्राचा दौरा केला, ज्यामध्ये नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करणे आणि कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उभारणे हे मुख्य उद्दिष्ट होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसचिव डॉ. सुवर्णा खरात आदी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळेल, करिअरच्या संधी वाढतील आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील क्षमता सशक्त होईल.

Comments are closed.