दहावीच्या बोर्ड परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चांवर राज्य शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण देत त्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमांवर गणित भाग-१, गणित भाग-२ आणि विज्ञान भाग-१ या विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध झाल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचे मंडळाने सांगितले.
पुणे विभागीय कार्यालयातील अधीक्षक चंद्रकांत जेवळीकर यांनी काही अज्ञात व्यक्तींनी टेलिग्राम ग्रुपवर प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात संबंधित ग्रुपच्या अॅडमिनसह काही सदस्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
मंडळाच्या माहितीनुसार, समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली गणित भाग-२ ची प्रश्नपत्रिका ९ मार्च रोजी परीक्षा झाल्यानंतरच ग्रुपवर टाकण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच काही जण प्रश्नपत्रिका आधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मंडळाने सांगितले. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सावध राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना व पालकांना करण्यात आले आहे.

Comments are closed.