रेल्वे तिकीट रद्द नियम कडक! उशिरा कॅन्सलेशनवर परतावा नाही! | No refund for late ticket cancellation!

No refund for late ticket cancellation!

प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच तिकीट व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘कन्फर्म’ तिकिटांच्या रद्द करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. नव्या नियमानुसार, ट्रेन सुटण्याच्या आठ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही. तसेच तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार परताव्याची रक्कम ठरवली जाणार असून, उशिरा कॅन्सलेशन केल्यास प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास रद्द करण्याचा निर्णय वेळेत घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

No refund for late ticket cancellation!

नवीन नियमांनुसार, ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास केवळ कॅन्सलेशन शुल्क आकारले जाईल. ७२ ते २४ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास २५ टक्के रक्कम कपात केली जाईल, तर २४ ते ८ तासांच्या आत कॅन्सलेशन केल्यास ५० टक्के रक्कम वजा होईल. मात्र, आठ तासांपेक्षा कमी वेळ राहिल्यास कोणतीही रक्कम परत मिळणार नाही. या जाचक नियमांवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रद्द केलेली जागा पुन्हा पूर्ण दराने विकली जात असताना ग्राहकांचे पैसे जप्त करणे योग्य नाही, असा सवाल संस्थेचे प्रतिनिधी सूर्यकांत पाठक यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, प्रवाशांसाठी एक दिलासा देणारा बदलही करण्यात आला आहे. आता प्रवासी ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटे आधीपर्यंत आपला ‘बोर्डिंग पॉइंट’ ऑनलाइन पद्धतीने बदलू शकतात. मोठ्या शहरांमध्ये अनेक स्थानके असल्यामुळे ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाने हे बदल करताना तिकीट चार्ट तयार होण्याच्या वेळेत झालेल्या बदलाचा आधार घेतला आहे. पूर्वी चार्ट ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी तयार होत होता; मात्र आता तो ९ ते १८ तास आधी तयार केला जातो. त्यामुळे जुन्या ४८/१२/४ तासांच्या नियमांऐवजी ७२/२४/८ तासांची नवीन वेळमर्यादा लागू करण्यात आली आहे.

या नव्या नियमांमुळे शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटे ब्लॉक करून ठेवण्याच्या प्रकारांना आळा बसेल आणि खऱ्या प्रवाशांना तिकिटे मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, या धोरणामुळे तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक होणार असून, प्रवाशांनी योग्य नियोजन करूनच प्रवास करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

Comments are closed.