आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना तात्काळ पोलिस मदत मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘११२’ हेल्पलाइनवर आलेल्या कॉलसाठी अधिकारक्षेत्राचे कोणतेही बंधन राहणार नाही, असे स्पष्ट निर्देश नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले आहेत.
११२ वरून सूचना मिळताच घटनास्थळाच्या सर्वात जवळ असलेल्या पोलिस वाहनाने विलंब न करता तिथे पोहोचणे बंधनकारक राहणार आहे.
अलीकडील काळात ११२ क्रमांकावर तक्रार नोंदवूनही पोलिस वेळेत न पोहोचल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. काही प्रकरणांत बीट पोलिसांनी तो भाग त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे कारण देत प्रतिसाद दिला नव्हता, तर काही ठिकाणी जवळ असूनही पोलिस घटनास्थळी पोहोचले नाहीत. या गंभीर बाबींची दखल घेत आयुक्तांनी हा ठाम आदेश जारी केला आहे.
राज्यात ११२ साठी अत्याधुनिक ‘एमईआरएस’ प्रणाली कार्यरत असून, कॉल येताच कॉलरचे स्थान स्वयंचलितपणे निश्चित केले जाते आणि माहिती थेट संबंधित नियंत्रण कक्षाकडे पाठवली जाते. तेथून जवळच्या आपत्कालीन प्रतिसाद वाहनाला त्वरित सूचना दिल्या जातात.
नागरिकांना अधिकारक्षेत्राची माहिती नसते, त्यामुळे ११२ कॉलच्या वेळी पोलिसांनी सीमा हा मुद्दा न करता तत्काळ मदत पोहोचवावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आता या आदेशांची अंमलबजावणी कितपत काटेकोरपणे होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.