परीक्षेच्या दिवशी हॉलतिकीटच नाही! १३३ एमसीए विद्यार्थी परीक्षेपासून वंचित; श्री साई इन्स्टिट्यूटच्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल! | No Hall Ticket on Exam Day; 133 MCA Students Affected!

No Hall Ticket on Exam Day; 133 MCA Students Affected!

छत्रपती संभाजीनगर येथील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील १३३ विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी हॉलतिकीट न मिळाल्याने परीक्षेला बसता आले नाही. चार डिसेंबर रोजी पहिला पेपर असतानाही विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यात आले नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात तसेच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.

No Hall Ticket on Exam Day; 133 MCA Students Affected!

विद्यार्थ्यांनी कर्मचारी व शिक्षकांकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. प्रवेश घेऊन शुल्क स्वीकारल्यानंतरही वेळेत हॉलतिकीट न दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षा सुरू असतानाही तिकीट न मिळाल्याने सर्व १३३ विद्यार्थी पेपरपासून वंचित राहिले. संस्थाचालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.

या प्रकरणी एमसीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी साक्षी शेलार (वय २१) हिने दिलेल्या तक्रारीवरून संस्थेचे चेअरमन विक्रांत जाधव, जे. के. जाधव, शिक्षक संघपाल कांबळे आणि लक्ष्मण गायकवाड यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा वारंवार संपर्क करूनही संस्थाचालकांनी टाळाटाळ केली, तसेच वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन हॉलतिकीट घ्या असा दिशाभूल करणारा सल्ला दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुट्टीवर असल्याने तक्रार नोंदविण्यास विलंब झाला. पोलिस उपनिरीक्षकही उशिरा पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागली. या घटनेमुळे शिक्षण संस्थांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.