जिल्ह्यातल्या तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांचं अनुदान फक्त ई-केवायसी न झाल्यानं अडकलंय. अतिवृष्टी, पुरानं मराठवाडा हादरला, ३२ लाख हेक्टरवरचं पीक पुरतं वाहून गेलं. पंचनामे झाले, सरकारनं जून ते सप्टेंबरदरम्यानच्या नुकसानीसाठी टप्प्याटप्प्याने मदतनिधी मंजूरही केला.
डीबीटीनं रक्कम पाठवली जातेय, पण केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जात नाहीयत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नव्यानं मंजूर झालेल्या ३७०.६० लाखांच्या निधीतून रब्बीसाठी बियाणं व इतर गरजांसाठी प्रती हेक्टरी दहा हजारांची मदतही ठेवली आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या बाधित शेतकऱ्यांची संख्या ६.४४ लाख तर २ ते ३ हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्यांची संख्या ४१ हजार इतकी आहे. यापैकी ५ लाखांहून अधिकांची नावं पोर्टलवर अपलोड झालीत.
अग्रीस्टेक आयडी असलेल्या ३.७१ लाख शेतकऱ्यांना अनुदान खात्यात जमा झालं. पण उरलेले १ लाख २४ हजार ८०२ शेतकरी—ई-केवायसी किंवा फार्मर आयडी नसल्यामुळे—अनुदानापासून वंचितच राहिलेत.
जिल्हा प्रशासनानं स्पष्ट सांगितलं की, तातडीने ई-केवायसी व अग्रीस्टेक नोंदणी पूर्ण करा, नाहीतर येणाऱ्या मदतीपासूनही हात धुवावे लागतील.

Comments are closed.