गेल्या काही वर्षांपासून NEET PG, DNB, FET, GPAT अशा वैद्यकीय प्रवेश परीक्षांबाबत सोशल मीडियावर चुकीची, अर्धवट आणि भ्रामक माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि योग्य निर्णय घेणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अधिकृत, अचूक आणि वेळेवर माहिती मिळावी यासाठी National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS) ने खास व्हॉट्सअॅप चॅनेल सुरु केला आहे.
महत्त्वाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर
NBEMS ने सुरु केलेल्या या व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे परीक्षा, वेळापत्रक, अर्ज प्रक्रिया, निकाल, हॉल तिकिटे, परिपत्रक अशा सगळ्या गोष्टींची अचूक आणि थेट माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. यामुळे कोणतीही अफवा पसरविण्याची शक्यता कमी होणार असून, अधिकृत घोषणांवरच भर दिला जाणार आहे.
चॅनेल कोणासाठी?
हा चॅनेल केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर NBEMS मान्यताप्राप्त संस्था, प्रशिक्षणार्थी, परीक्षार्थी आणि संस्थांमधील समन्वयक यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे. जे संस्थांचे मानांकन घेऊ इच्छितात, त्यांनाही पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे यांची सविस्तर माहिती याच चॅनेलवर मिळणार आहे.
परीक्षा, प्रशिक्षण आणि मूल्यांकनासाठी उपयुक्त
NBEMS च्या परिपत्रकानुसार हा चॅनेल मुख्यतः तीन प्रमुख घटकांसाठी – परीक्षा, मूल्यांकन आणि प्रशिक्षण – उपयोगी ठरणार आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळी अधिसूचना, सुचना, थिसीस संदर्भातील मार्गदर्शन, वेबिनार्स आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती वेळोवेळी मिळणार आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी सुलभ माध्यम
NEET PG, NEET MDS, NEET SS, FET, DNB आदी परीक्षांद्वारे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चॅनेल अत्यंत उपयुक्त आहे. समुपदेशन प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन, प्रशिक्षणार्थी म्हणून नोंदणी, थिसीस व अन्य शैक्षणिक माहिती येथे उपलब्ध असेल.
८० हून अधिक अभ्यासक्रम, १००० हून अधिक संस्था
NBEMS भारतभरातील १००० हून अधिक वैद्यकीय संस्था आणि ८० पेक्षा जास्त पदव्युत्तर व सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांसाठी जबाबदार आहे. अशा परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्यांना या चॅनेलवरून सुसंगत माहिती व वेळेवर अपडेट्स मिळणार आहेत.
अधिकृत चॅनेलची लिंक
NBEMS चा अधिकृत WhatsApp चॅनेल खालील लिंकवरून जॉइन करता येईल:
https://whatsapp.com/channel/0029VbAseBd7T8bTcZS9mg20
NBEMS ने सर्व विद्यार्थ्यांना आणि संस्थांना या चॅनेलचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थी, अफवांपासून सावध राहा!
या अधिकृत चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी फक्त NBEMS कडून प्राप्त होणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. अशा प्रकारे परीक्षा संबंधित अफवांपासून सावध राहून तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल.