राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ही नियुक्ती केली असून, याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

ही नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1) अन्वये करण्यात आली आहे. विवेक भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी होईल तोपर्यंत) ते MPSC अध्यक्षपदी कार्यरत राहणार आहेत. तोपर्यंत, म्हणजे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत, अनुच्छेद 316 (1-क) नुसार डॉ. अभय एकनाथ वाघ, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
कोण आहेत विवेक भीमनवार?
विवेक लक्ष्मीकांत भीमनवार हे महाराष्ट्र केडरचे 2009 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी एलएलबी व एमएससी पदवी संपादन केली आहे. सध्या ते महाराष्ट्र शासनाचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत असून, त्यांच्या कार्यकाळात परिवहन विभागात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले गेले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदेशीर बाईक टॅक्सीविरोधात कठोर कारवाई करून विशेष लक्ष वेधले.
यापूर्वी त्यांनी ठाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून तसेच वर्धा जिल्हाधिकारी म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय आयकर विभागात काम करण्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि प्रशासकीय कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे विवेक भीमनवार यांची नियुक्ती MPSC साठी महत्त्वाची मानली जात आहे.

Comments are closed.