NEET UG 2026 देण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने एक अत्यंत महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. ही सूचना नोंदणी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी देण्यात आली असून, पुढील टप्प्यांमध्ये अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली महत्त्वाची कागदपत्रे तपासून, अद्ययावत व पडताळून ठेवावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही अॅडव्हायजरी ५ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या सूचनेत प्रामुख्याने आधार कार्ड तपशील, दिव्यांग उमेदवारांशी संबंधित कागदपत्रे आणि आरक्षण प्रवर्ग प्रमाणपत्रांवर भर देण्यात आला आहे. NTAने सांगितले आहे की, NEET अर्जामध्ये भरण्यात येणारी माहिती आणि आधार कार्डवरील तपशील अगदी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, छायाचित्र, पत्ता आणि बायोमेट्रिक माहिती (लागू असल्यास) यांचा समावेश आहे. कोणतीही चूक असल्यास विद्यार्थ्यांनी ती तातडीने UIDAIच्या अधिकृत वेबसाइट (uidai.gov.in) किंवा जवळच्या आधार अपडेट केंद्रावर दुरुस्त करून घ्यावी, असे NTAने स्पष्ट केले आहे.
तसेच, दिव्यांग (PwD) उमेदवारांनी केवळ वैध, अद्ययावत व नूतनीकरण केलेलेच Unique Disability ID (UDID) कार्ड वापरावे, अन्यथा कागदपत्र पडताळणीदरम्यान अडचणी येऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
आरक्षित प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी EWS आणि OBC-NCLसह सर्व प्रवर्ग प्रमाणपत्रे नियमांनुसार वैध आहेत की नाहीत, याची खात्री करून घ्यावी आणि अर्ज भरण्यापूर्वी ती तयार ठेवावीत.
NEET UG 2026 ची नोंदणी प्रक्रिया आणि परीक्षा तारखा लवकरच जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांनी नियमितपणे nta.ac.in आणि neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊन ताज्या सूचना तपासाव्यात, असे NTAने आवर्जून सांगितले आहे.

Comments are closed.